अहमदाबाद : गुजरातचे माजी पोलीस महानिरीक्षक डी जी वंजारा यांनी मंगळवारी एका विशेष न्यायालयात एक गौप्यस्फोट केलाय. इशरत जहाँ फेक एन्काऊंटर प्रकरणी केंद्रीय चौकशी समितीला (सीबीआय) तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांना अटक करायची होती. परंतु, असं घडलं नाही, असं त्यांनी म्हटलंय. सीबीआय न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका सुटका याचिकेत वंजारा यांचे वकील व्ही. डी. गज्जर यांनी न्यायाधीश जे. के. पांड्या यांच्या समक्ष हा दावा केला. सीबीआयला मोदी - शहा यांना अटक करायची होती, परंतु असं घडलं नाही. आता तर नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधान पदावर आहेत तर अमित शाह भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात जामीन वंजारा यांना जामीन मिळालाय. याआधीही त्यांनी, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते चौकशी अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी करत होते, असा आरोप केला होता. सीबीआयनं शाह यांना २०१४ मध्ये पुरावे नसल्याचं कारण देत दोषमुक्त घोषित केलं होतं.


इशरत जहाँ प्रकरण 


जून २००४ मध्ये मुंबईची रहिवासी असलेल्या इशरत जहाँ या १९ वर्षीय तरुणीची आणि तिचा मित्र जावेद उर्फ प्राणेश तसंच मूळ पाकिस्तानी जीशान जौहर आणि अमजद अली राणा यांना माजी आयजी वंजारा यांच्या टीमनं अहमदाबादजवळ एन्काऊंटरमध्ये ठार केलं होतं. इशरत जहाँ आणि तिच्या साथीदारांना तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या मिशनवर आलेले दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. परंतु, सीबीआयनं आपल्या निष्कर्षात हे फेक एन्काऊंटरचं प्रकरण असल्याचं म्हटलं होतं. 


या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.