‘इथं’ रावणाला आधी गोळ्या घालून `ठार` केलं अन् मग...; दसऱ्याची जगावेगळी परंपरा
Dasara Ravan Killed By Bullets: सामान्यपणे रावणाचं दहन केलं जातं. मात्र भारतामध्ये एका ठिकाणी रावणावर गोळीबार करुन त्याचा खात्मा केला जातो. नेमकी ही प्रथा काय आहे आणि कुठे हे केलं जातं पाहूयात सविस्तर...
Dasara Ravan Killed By Bullets: दसरा देशभरामध्ये अगदी उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. सायंकाळी देशभरातील अनेक छोट्या, मोठ्या मैदानांपासून ते चौकाचौकांमध्ये रावण दहन केलं जातं. मात्र काही ठिकाणी रावण दहनाच्या फारच वेगळ्या आणि यापूर्वी कधीही न ऐकलेल्या प्रथा प्रचलित आहेत. अशीच एक प्रथा राजस्थानमधील उदयपुरवाटीमध्ये मागील 125 वर्षांहून अधिक काळापासून पाळली जाते. याच अनोख्या प्रथेसंदर्भात आपण जाणून घेऊयात.
बंदुकांनी गोळीबार करुन करतात रावणाचा खात्मा
उदयपुरवाटी येथील दादूपंथी समाजामध्ये रावण दहनाची एक फारच वेगळी परंपरा आहे. याच परंपरेनुसार यंदाच्या दसऱ्यालाही रावणाला संपवण्यात आलं. आता इथे मुद्दाम रावण दहन असा शब्द वापरला नाही कारण या सामाजातील लोक बंदुकांनी अंदाधुंद गोळीबार करुन रावणाला संपवलं जातं. आधी दादूपंथी समाजातील रावणाला संपवणारी सेना रावणाच्या पुतळ्यावर बेछूद गोळीबार करते आणि त्यानंतर मशाल बाण मारुन रावणाचं दहन केलं जातं. दरवर्षी 15 बंदुकांचा वापर या रावणाचा खात्मा करण्यासाठी वापरल्या जातात. मात्र यंदा राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने आचारसंहिता लागू असल्याने प्रशासनाने केवळ 3 बंदुकांच्या वापराची परावगीन दिली होती.
रावण सेनेचाही केला जातो अंत
या आगळ्यावेगळ्या रावण दहनामध्ये रावण्याच्या सेनेला लक्ष्य करण्यासाठी आधी चांदमारी येथे नेमबाजीचा सरावही दादूपंथातील तरुणांच्या टोळीकडून केली जाते. विजयादशमीच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने शस्त्रांची पूजा केली जाते. यावेळेस 101 अगदी छोट्या आकाराच्या तोफा (बार) झाडून सलामी दिली जाते. रावणाच्या पुतळ्याबरोबर रावण सेनेच्या रुपात पांढऱ्या रंगाची मातीचे माठ रावणाच्या पुतळ्याच्या बाजूला ठेऊन त्यावर निशाणा साधला जातो. आधी हे मातीचे माठ बंदुकीच्या गोळ्यांनी फोडले जातात मग रावणाच्या पुतळ्यावर गोळीबर केला जातो.
हजारो लोक लावतात हजेरी
मंगळवारी संध्याकाळी 35 फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. दरवर्षी हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी नांगल नदीच्या किनाऱ्यावर पंचक्रोषीतून हजारो लोक जमा होतात. गावातून मिरवणूक काढत दादूपंथ समाजातील रावणाचं दहन करणारी टोळी नदीकाठी रावणाचा पुतळा उभारलेला असतो तिथे दाखल होते. आधी बंदुकींमधून गोळीबार करुन रावणाची सेना आणि रावणाला संपवल्यानंतर अग्नी असलेला रामबाण मारुन रावणाचं दहन केलं जातं.
1897 पासून ही परंपरा
126 वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी सुरु आहे. दादूपंथाचे लोक 1890 साली दातारामगढ येथून उदयपुरवाटी येथे स्थायिक झाले. त्यानंतर 1897 पासून दादूपंथी समाजाकडून दसरा उत्सव साजरा केला जाऊ लागला.