सोहेल कासकरचे महिनाभरात भारतात प्रत्यार्पण ?
सोहेल हा दाउदचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरचे महिनाभरात भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. त्याच्याविरोधात बनावट पारपत्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोहेल हा दाउदचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे. 2014 मध्ये "नार्को टेररिझम'प्रकरणी त्याचे स्पेनहून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले होते. कोलंबियातील दहशतवादी गटाला अमली पदार्थ पुरवण्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्र सरकारने जोर लावला आहे.
प्रक्रिया अंतिम टप्प्यात
सोहलच्या भारत प्रत्यार्पणाला अमेरिकेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याचे दुबईत प्रत्यार्पण व्हावे, यासाठी दाउद टोळी प्रयत्नशील आहे. मात्र प्रत्यार्पणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सोहेलला महिनाभरात भारतात आणले जाईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला
आहे.
बनावट पारपत्र
सोहेल याने शेख मोहम्मद सोहेल या नावाने बनावट पारपत्र बनवले आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याच्या पारपत्राची प्रतही भारतीय यंत्रणांनी मिळवली आहे. दुबईतून 2013 मध्ये या पारपत्राचे नूतनीकरण करण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.