कोरोनावर उपचार करण्यासाठी आणखी एका औषधाला हिरवा कंदील
हे औषध डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायसेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी तयार केले आहे
मुंबई : कोरोना महामारीच्या वाढत्या रुग्णसंख्यामुळे आरोग्य सेवेवर ताण येऊ लागला आहे आणि कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेले औषधे, इंजेक्शन आणि ऑक्सिजनसारख्या गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. ज्यामुळे आरोग्य सेवे अभावी अनेक रुग्णांचे प्राण गेले आहेत. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. भारतीय शास्त्रज्ञांना कोरोनावर उपचार करण्याचे आणखी एक सर्वोत्तम औषध सापडले आहे. याला आज भारत सरकारची मान्यताही मिळाली आहे आणि लवकरच हे औषध बाजारात उपलब्ध आहे.
हे औषध डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायसेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी तयार केले आहे. याला टू डॉक्सी डी ग्लूकोज असे नाव देण्यात आले आहे.
चाचणीमध्ये परिणाम उत्कृष्ट
डॉ सुधीर चंदना म्हणाले की, आम्ही या औषधासाठी एप्रिल 2020 मध्ये चाचणी सुरू केली. त्यानंतर पहिल्याच प्रयोगात याचा चांगला निकाल पाहायला मिळाला. मे 2020 मध्ये याला क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती, जी ऑक्टोबरपर्यंत चालली. या औषधाला आता 2-deoxy-D-glucose (2-DG) नाव देण्यात आले आहे. जे लवकरच उपचारासाठी बाजारात उपलब्ध होईल. असे दिसून आले आहे की, रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना हे औषध दिल्यास ते लवकर बरे होतात.
रुग्णांना ऑक्सिजनची समस्या होणार नाही
दिल्लीतील डीआरडीओच्या INMAS विभागाचे वैज्ञानिक डॉ. अनंत नारायण भट्ट म्हणाले की, ट्रायलच्या तिसऱ्या फेरीत आम्ही मोठ्या प्रमाणावर चाचणी केली, आणि त्याचा उत्कृष्ट निकाल समोर आला आहे. ते म्हणाले की, "या औषधाचा वापर केल्याने ऑक्सिजनची कमतरता निर्माण होणार नाही आणि या औषधाचा आपातकालीन परिस्थितीत उपयोग करु शकतो. लवकरच डॉ. रेड्डीज लॅबच्या सहकार्याने या औषधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू होईल."
ते म्हणाले की, हे औषध पावडरच्या रूपात आहे, जे सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिसळून वापरता येते. क्लिनिकल चाचणीमध्ये असे आढळले आहे की, हे औषध घेत असलेले रुग्ण इतर रुग्णांच्या तुलनेत अडीच दिवस अगोदर बरे झाले आहे.
असे कार्य करते
हे औषध संक्रमित पेशींमध्ये जमा होते आणि वायरल सिंथेसिस आणि उर्जा निर्मितीद्वारे व्हायरसला वाढण्यास प्रतिबंध करते. या औषधाची विशेषता म्हणजे ते व्हायरस संक्रमित पेशी ओळखते आणि त्यांच्यावर वेगाने मात करते.