नवी दिल्ली : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी एका महिलेने आपल्या 10 - 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलाबरोबर अश्लील नृत्य केलं आणि ते व्हिडिओ व्हायरल केले. या व्हिडिओची दिल्ली महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली महिला आयोगाचे म्हणणे आहे की, 'या तरुण वयातच मुलाला महिलांसह अश्लील कृत्य करणं आणि त्यासाठी प्रोत्साहित करण्यास शिकवलं जात आहे. शिवाय आई-मुलाचं पवित्र नातंही कलंकित होत आहे. असा मुलगा भविष्यात महिला आणि मुलींबद्दल काय विचार करेल? जर हे असंच सुरु राहिले तर पुढे जाऊन या मुलामध्ये गुन्हेगारी मानसिकता उद्भवू शकते, हे रोखण्यासाठी आम्ही कारवाईची मागणी करत दिल्ली पोलिसांना नोटीस पाठविली आहे.


व्हायरल व्हिडिओमध्ये ही महिला आपल्या लहान मुलाकडून गाण्यांवर अश्लिल अभिनय करुन घेत होती. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात होते. सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्याप्रमाणावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर हे व्हिडिओ हटवण्यात आले. व्हिडिओ बनविणार्‍या महिलेचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 60 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान दिल्ली महिला आयोगाने महिलेविरूद्ध कठोर कारवाई करण्यास सांगितलं असून योग्य आणि चुकीच्या गोष्टींमधला फरक कळावा यासाठी मुलाचं समुपदेशन करावं असं म्हटलं आहे.


दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटलंय, सोशल मीडिया एखाद्याची कला दर्शविण्यासाठी एक चांगला व्यासपीठ आहे. पण काही जण केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी लज्जास्पद कृत्यं करतात. 10-12 वर्षाच्या लहान मुलाला चांगली शिकवण देण्याचं सोडून हि महिला केवळ प्रसिद्धीसाठी अश्लील व्हिडिओ बनवत आहे. आम्ही महिला आयोग आहोत, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही चुकीच्या महिलेस पाठिंबा देऊ.