Dead lizard in School Food: झारखंडमधील पाकुड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडमधील पाकुडमधील एका खासगी शाळेत मध्यान्ह भोजन म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नपदार्थांमध्ये मेलेली पाल आढळून आली आहे. हे अन्न खाऊन 100 हून अधिक विद्यार्थ्यांना मळमळू लागलं आहे. या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. 


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकुड जिल्ह्यामधील पाकुडिया प्रांतामधील एका खासगी शाळेमध्ये नेहमीप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या खाद्यपदार्थामध्ये मेलेली पाल आढळून आली. हा पदार्थ तयार करतानाच त्यामध्ये पाल पडल्याची माहिती समोर आली. मात्र ही गोष्ट कोणाच्याही लाक्षात आली नाही. हेच अन्न विद्यार्थ्यांना वाढण्यात आलं. विद्यार्थ्यांनी हा पदार्थ सेवन केल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. उलट्या, मळमळणे आणि पोटदुखीसारखा त्रास जाणवू लागल्याने 100 हून अधिक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त न्यूज 18 ने दिलं आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.


पश्चिम बंगालमध्ये 60 विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलं


समोर आलेल्या माहितीनुसार 60 हून अधिक विद्यार्थ्यांना थेट पश्चिम बंगालमधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर 40 विद्यार्थ्यांना स्थानिक सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनातील शिक्षण विभाग, आरोग्य विभागाबरोबरच पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून सर्व विद्यार्थींची प्रकृती स्थिर असून कोणाच्याही जीवाला धोका नाही. या सर्वांना उपचारानंतर डिस्चार्ज दिला जाईल. सध्या या भोजनामध्ये पाल नेमकी कशी पडली, जेवण वाढण्याआधी त्याची तपासणी करण्यात आली नव्हती का? या सर्व गोंधळासाठी कोण जबाबदार आहे? यासंदर्भातील तपास स्थानिक प्रशासनाने सुरु केला आहे.


पालकांनी केली कठोर कारवाईची मागणी


अनेकदा मध्यान्ह भोजनामध्ये पाल किंवा झुरळं किंवा किटक पडल्याच्या बातम्या समोर येतात. मात्र अशाप्रकरणांमध्ये कोणावरही कठोर कारवाई होताना दिसत नाही. अनेकदा सरकारी शाळांमध्ये देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे प्रकार वरचेवर ऐकायला आणि वाचायला मिळतात. मात्र झारखंडमधील खासगी शाळेमध्ये हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली. शाळा प्रशासनाने आपल्या स्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.