निर्लज्जपणाचा कळस... निर्भया प्रकरणातील आरोपी म्हणतो तेव्हा मी दिल्लीत नव्हतोच
निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Case) दोषींनी सोमवारीच आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली होती.
नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, फाशीची शिक्षा टाळण्यासाठी या दोषींकडून अत्यंत खालच्या थराला जाऊन प्रयत्न होत आहेत. या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार सिंह याने आता नवा कांगावा करायला सुरुवात केली आहे. निर्भयावर अत्याचार झाले त्यादिवशी मी दिल्लीत नव्हतोच, असे सांगत मुकेश सिंह याने आपल्या फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. थोड्याचवेळात दिल्ली न्यायालय यासंदर्भात निकाल सुनावणार आहे.
फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव
मुकेश कुमार सिंह याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, मला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले. बलात्काराच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर २०१२ रोजी मला दिल्लीत आणण्यात आले. यानंतर तिहार कारागृहात माझा प्रचंड छळ करण्यात आला.
मात्र, सरकारी वकिलांनी मुकेश सिंहचा हा आरोप फेटाळून लावला आहे. केवळ फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी सोमवारी न्यायालयाने मुकेश सिंह याची सर्व कायदेशीर अधिकार वापरू देण्याची याचिका फेटाळून लावली होती. आधीच्या वकिलांकडून माझी दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे मला फाशीच्या शिक्षेविरोधात पुन्हा अपील करण्याची संधी मिळावी, असे मुकेश सिंह याने म्हटले होते.
'निर्भया' प्रकरणातील दोषी म्हणतात '...तर फाशीची गरज काय?'
निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Case) दोषींनी सोमवारीच आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली होती. दोषींच्या वकिलांकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र लिहण्यात आले आहे. यामध्ये २० मार्चला दोषींना देण्यात येणाऱ्या फाशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.