नवी दिल्ली : सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि महत्वाचे नेते यांच्या ट्विटर अकाऊंटचे फॉलोअर्स घटल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांचेही फॉलोअर्स घटले आहेत. यामुळे राहुल गांधी वैतागले असून त्यांनी याबाबत थेट मोदी सरकारवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खा. राहुल गांधी यांनी थेट ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी अग्रवाल हे मोदी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केलाय.


यासंदर्भात राहुल गांधी यांनी तपशीलवार माहिती या पत्रात पाठवलीय. पूर्वी दर महिन्याला सरासरी २ लाखांहून अधिक नवे फॉलोअर्स वाढत होते. काही महिन्यांत ही संख्या ६.५ लाखांपर्यंत गेली. पण, ऑगस्ट २०२१ ला अकाऊंट अनलॉक झाले. तेव्हापासून महिन्याला फक्त २५०० फॉलोअर्स वाढताहेत.


ऑगस्ट ते डिसेंबर या सहा महिनांच्या काळात दर महिना २ लाख याप्रमाणे सुमारे १ कोटी फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ट्विटर हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म भारत सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचंही ते म्हणालेत. 


जगभरातील उदारमतवादी लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातील वैचारिक लढाई सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उदयास येत आहे. यामुळे ट्विटरसारख्या कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी येते, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 


ट्विटरच्या प्रवक्त्यानं पाठवलं हे उत्तर 
खा. राहुल गांधी यांनी पाठविलेल्या या पत्राला ट्विटरच्या प्रवक्त्यानं उत्तर दिलं आहे.आम्ही ट्विटर प्लॅटफॉर्मवर फेरफार, स्पॅमिंग आणि आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येक आठवड्यात लाखो खाती काढून टाकतो. तसेच त्यांच्यावर कारवाईही करत आहोत.


उत्तम आणि चांगली सेवा देण्यासाठी तसेच विश्वासार्ह खात्यांचे संचालन सुनिश्चित करण्यासाठी ट्विटर सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळे फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे फॉलोअर्सची संख्या ही अचूक आहे यावर विश्वास ठेवावा असं उत्तर ट्विटरच्या प्रवक्त्यानं पाठवलं आहे.