बंगळुरु : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केले. संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले. नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटरचे प्रकल्प संचालक एन. तिवारी यांनी राजनाथ सिंह यांच्या तेजसचे सारथ्य केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानाला तेजस असे नाव दिले होते. तेजस हे जगातील सर्वात लहान आणि सर्वात हलके लढाऊ विमान आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास अर्धा तासांचा कालावधी राजनाथसिंह यांनी तेजस या विमानात व्यतीत केला. तेजस खूपच आरामदायी आहे. आता भारत जगभरात लढाऊ विमानांची निर्यात करू शकेल. त्या उंचीपर्यंत भारत पोहोचला आहे. याबद्दल हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, डीआरडीओ आणि संबंधित संस्थांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी तेजस उड्डाणानंतर व्यक्त केली.


या तेजस विमानाचा वेग २००० किमी पेक्षा जास्त आहे. ते ५००० फूटांपेक्षा जास्त उंचीवर उड्डाण करू शकते. उड्डाणानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, 'मी तेजसमध्ये बसून तेजस कशाप्रकारे आहे हे अनुभवण्याची संधी मिळाली. मला माझ्या आयुष्याचा एक विशेष अनुभव घेता आला. मी वैमानिकाच्या पराक्रमाचे कौतुक करतो. एचएएल, वैज्ञानिक, डीआरडीओ यांच्याबद्दल गर्व वाटतो. अन्य देशांमध्येही तेजसची मागणी होत आहे, असे ते म्हणालेत.