मुंबई : जगातील सर्वाधिक उंचीवर स्थित युद्धभूमी म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या सियाचीन ग्लेशियर येथे पोहोचणं आता अगदी सोपं होणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लडाख येथे याविषयीची माहिती देत सियाचीन आता पर्यटनासाठी खुलं झाल्याचं स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजनाथ सिंह हे लडाखमध्ये भारतीय सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह श्योक नदीवर बांधलेल्या पुलाच्या उदघाटनासाठी पोहोचले होते. या पुलामुळे चीनसोबतच्या 'एलएसी' (Line of Actual Control)नजीक असणाऱ्या दौलत बेग ओल्डी सेक्टरशी सहजगत्या संपर्कात राहता येणार आहे.  




'पर्यटनाच्या दृष्टीने लडाखमध्ये बराच वाव आहे. त्य़ामुळे या क्षेत्राशी जोडलं जाण्याच्या कैक मार्गांंमुळे येथे मोठ्या संख्येत पर्यटकांचा ओघ वाढेल. तसंच आता सियाचीनही पर्यटक आणि पर्यटनासाठी खुलं झालं आहे. सियाचीन बेस कॅम्पपासून कुमार पोस्टपर्यंतचं संपूर्ण क्षेत्र आणि परिसर हा पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे', असं राजनाथ सिंह यांनी ट्विट करत सांगितलं. त्यामुळे सियाचीनपर्यंत जाऊ पाहण्याची इच्छा मनी बाळगणाऱ्या असंख्य पर्यकांसाठी ही सर्वाधिक आनंदाची बाब ठरत आहे.



कारगिल युद्धाच्या वेळी टायगर हिल आणि त्यानजीकच्या परिसरात पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने रोखलं होतं. येथीलच काही संवेदनशील भागांना भेट देता यावी याविषयीची परवानगी घेण्याचं सत्र बऱ्याच काळापासून लडाख आणि त्यानजीकच्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी सुरु ठेवलं होतं. त्यावरच सखोल विचार आणि सुरक्षेचे निकष लक्षात घेत आता हा निर्णय घेण्यात आले आहेत. या साऱ्यामध्ये सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही हेसुद्धा तितकंच खरं.