संरक्षण मंत्रालयाची `फेकुगिरी`; व्हीडिओतील मोठी चूक पकडली गेल्याने नाचक्की
सध्याच्या घडीला ही विमाने केवळ अमेरिकन लष्कराच्या ताफ्यात आहेत.
नवी दिल्ली: सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सध्या केंद्र सरकारकडून देशभरात पराक्रम पर्व साजरे केले जात आहे. यानिमित्ताने संरक्षण मंत्रालयाने एक खास व्हीडिओ तयार केला आहे. मात्र, एका संरक्षणविषयक नियतकालिकाने या व्हीडिओतील एक मोठी चूक उघड केली आहे. या व्हीडिओच्या सुरुवातीला आकाशात दोन विमाने उडताना दिसतात. ही एफ-१६ जातीची लढाऊ विमाने आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतीय वायुसेना एफ-१६ विमानांचा वापरच करत नाही.
दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने ही चूक मान्य केली असून ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या अक्षम्य चुकीमुळे संरक्षण मंत्रालयाची चांगलीच नाचक्की झाली आहे.
सध्याच्या घडीला अमेरिकन वायूदल एफ-१६ विमानांचा वापर करते. लॉकहीड मार्टिन या कंपनीकडून या विमानांची निर्मिती केली जाते. ही विमाने कोणत्याही ऋतूत कामगिरी पार पाडण्यासाठी सक्षम आहेत.