District Magistrate Went To Liquor Shop: उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये मागील काही काळापासून मद्यविक्री करताना अतिरिक्त किंमत आकारली जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. मद्यासाठी अधिक किंमत मोजावी लागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारीच एका मद्यविक्री करणाऱ्या दुकानात पाहोचले. त्यानंतर जे काही घडलं त्याचा फटका या दुकानादाराला बसला. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेहराडूनचे जिल्हाधिकारी सवीन बन्सल यांनी बुधवारी रात्री अचानक मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना भेट दिली. येथील ओल्ड मसुरी रोडबरोबरच राजपूर रोडवरील मद्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जिल्हाधिकारी बन्सल ग्राहक म्हणून गेले. आपल्या कारने या दुकानांमध्ये पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपण कोण आहोत? कशासाठी आलो आहोत हे सांगितलं नाही. त्यांच्याबरोबर पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांचा लवाजमा नव्हता. आपण ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीला थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच मद्य विकत असल्याची कल्पना दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्हती. 


20 रुपयांसाठी 50 हजारांचा दंड


सर्वसामान्य नागरिकांकडून आकरले जातात तितके वाढीव दर वगैरे सांगून झाल्यानंतर समोरची व्यक्ती जिल्हाधिकारी आहे असं समजल्यावर दुकानात एकच गोंधळ उडाला. जिल्हाधिकाऱ्यांनी या दुकानादाराला 50 हाजारांचा दंड ठोठावला. हा दुकानदार 660 रुपयांची मद्याची बाटली 680 रुपयांना विकत होता. अशाप्रकारे सर्वच कंपन्यांचे मद्य अतिरिक्त किंमतीला विकलं जात असल्याचं लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 50 हजारांचा दंड दुकानदाराला ठोठावला. वाढीव दरात दारु विकून बाटली मागे अतिरिक्त 20 रुपये कमवण्याच्या नादात या दुकानादाराला 50 हजारांचा फटका बसला.


...म्हणून मोठा आर्थिक दंड


जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीदरम्यान दरपत्रकामध्ये दुकानादारांनी फेरफार केल्याचं दिसून आलं. त्यामुळे ग्राहकांना खरे दर कळत नसून दुकान किती काळ सुरु असते हे सुद्धा लिहिलेलं दिसून आलं नाही. तसेच दुकानदारांकडे मद्यविक्रीसंदर्भात दिला जाणारा परवानाही नसल्याचं आढळून आल्याने मोठा आर्थिक दंड ठोठावला गेला. 


रुग्णालयाला अचानक भेट


डेहराडूनचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्यापासून सवीन बन्सल हे त्यांच्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. मध्यंतरी त्यांनी डेहराडूनमधील सरकारी रुग्णालयाला अचानक भेट दिली होती. त्यावेळीही त्यांनी आपली खरी ओळख लपवलं होती. त्यांनी तेथील गोंधळ पासून यंत्रणेला सुधारण्यासंदर्भातील इशारा दिला होता. 


बाईकवरुन फेरफटका


या आधी बन्सल यांनी डेहराडूनच्या रस्त्यांवर उतरुन वाहतूक समस्या समजून घेतली होती. शहरामध्ये वाहतूककोंडी नेमकी का वाढत आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी बाईकवरुन पोलीस अधिकाऱ्यांबरोबर फेरफटका मारला होता. त्यांनी शहरातील 10 किलोमीटरचा टप्पा बाईकवरुन प्रवास करत वाहतूक समस्या समजून घेतली. ते जिल्हाधिकारी कार्यालयापासून रायपूर रोडवरुन घंटाघर, पलटन बाझार आणि बल्लापूर चौकातून फेरफटका मारलेला.