नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सदर बाजार पोलीस स्थानकात एका व्यक्तिने एक तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ही तक्रार तर दाखल करून घेतली. पण, ज्या आरोपीविरूद्ध ही तक्रार आहे त्या आरोपीचे नाव पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. पोलिसात आलेली तक्रार ही चक्क एका गाईविरोधात आहे. गायीने दिलेल्या धडकेत रस्त्यावर दुचाकीने प्रवास करणाऱ्या एका व्यावसायिकाचा पाय फ्रॅक्चर झाला. पाय फ्रॅक्चर झाल्याच्या रागात या व्यावसायिकाने थेट पोलीस ठाणे गाठले आणि त्याने गायीविरोधात तक्रार दिली. 


पोलिसांसमोर मोठेच आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार तर नोंदवली. पण, पोलिसांसमोर उभे ठाकलेले आव्हान भलतेच आहे. धडक दिलेली गाय नेमकी ओळखायची कशी? ती गाय कोणाची होती, कोठून आली होती, कोठे चालली होती, याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आता या गायीचा तपास करायचा तरी कसा, हा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला पोलिसांनी सुरूवात केली आहे.


पोलीसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शकील (वय-४५) असे तक्रारदारांचे नाव असून गायीच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले आहेत. शकील आणि त्यांचे कुटुंबिय हे दरियागंज परिसरात राहतात. त्यांचा स्वत:चा व्यवसाय असून, दिल्ली गेट इथल्या त्यांच्या कारखान्यात हेअर मशीन मसाजर बनवले जातात. त्यामुळे घर आणि कामाचे ठिकाण या ठिकाणी शकील यांचे नेहमीच येणेजाणे असते. 


काय घडले नेमके?


दरम्यान, शकील हे २७ एप्रिलच्या सायंकाळी ७.१५ वाजनेच्या सुमारास सदर बाजारात निघाले होते. दरम्यान, एका अज्ञात गायीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे शकील खाली पडले. तसेच, त्यांच्या पायालाही जखम झाली. त्यांना एलएनजेपी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रूग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे सांगितले. 


दरम्यान, शकील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात गायीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच, गाय, गायीचा रंग, तिचा आकार तसेच, तीचा मालक याचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप पोलिसांना तपासात यश आले नाही.