नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शाहांच्या भेटीसाठी केजरीवाल त्यांच्या घरी पोहोचले. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केजरीवाल आणि अमित शाह यांची पहिल्यांदाच भेट झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल विरुद्ध अमित शाह असा सामना रंगला होता. आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री या नात्यानं दोन्ही नेत्यांची भेट झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर केजरीवाल प्रथमच शाह यांची भेट घेतली आहे.  केजरीवाल यांची ही भेट औपचारीक होती. दिल्लीला राज्याचा दर्जा नाहीए आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही केंद्र सरकारच्या हाती आहे. केजरीवाल सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले. पण यावेळी केजरीवाल यांनी केंद्राकडे सहकार्याची अपेक्षा केली आहे.



केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. दिल्लीशी संबंधित विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. दिल्लीच्या विकासाठी एकत्र काम करण्यावर आमचे एकमत झाले आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी या भेटीनंतर केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत अमित शाह यांनी अतिशय आक्रमक पद्धतीने प्रचार केला. त्यांनी शाहीनबागसह इतर अनेक मुद्यांवरून केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तरीही भाजपचा पराभव झाला. भाजपला केवळ ८ तर केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला ६२ जागा मिळाल्या आहेत.