नवी दिल्ली:  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. मंगळवारी संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे केजरीवाल यांनी कालपासून स्वत:ला आयसोलेट करुन घेतले होते. त्यांच्या सर्व नियोजित बैठकाही रद्द करण्यात आल्या होत्या. यानंतर त्यांची कोरोना टेस्ट झाली होती. या टेस्टचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता अरविंद केजरीवाल कोरोना नेगेटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांनी केजरीवालांचा 'तो' निर्णय बदलला



दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांत केवळ दिल्लीकरांनाच उपचार मिळतील, असा आदेश काढला होता. मात्र, नायब राज्यपाल यांनी हा आदेश रद्द केल्यामुळे दिल्लीत सध्या केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाची ठिणगी पडली आहे. 


'दिल्ली सरकारच्या निर्णयात ढवळाढवळ करण्यासाठी भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणला'


दरम्यान, दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यताही आज दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती. एम्सच्या संचालकांनी दिल्लीत कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचे मान्य केले आहे. परंतु केवळ केंद्र सरकारच त्याची घोषणा करू शकते, असेही जैन यांनी सांगितले होते.