Kejriwal Sent To Judicial Custody: सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ईडीच्या न्यायालयीन कोठडीमधील मुक्काम वाढला आहे. केजरीवाल यांना पुढील 2 आठवड्यांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 21 मार्च रोजी केजरीवाल यांना कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने राहत्या घरातून चौकशीनंतर ताब्यात घेतलं होतं. मनी लॉन्ड्रिंगचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. आज केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सर्वात आधी केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत आणि त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्यात आता आणखीन 14 दिवसांची भर पडली आहे. राउज एवेन्यू कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये कोठडी वाढवण्याची ईडीची मागणी मान्य करण्यात आली.


तपासात सहकार्य करत नाहीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या सुनावणीदरम्यान ईडीची बाजू मांडणारे असोसिएट सॉलिसिटर जनरल राजू यांनी केजरीवाल तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. केजरीवाल विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं देत नाहीत, असंही ईडीच्यावतीने राजू यांनी कोर्टाला सांगितलं. केजरीवाल यांची कोठडी वाढवून हवी असल्याने या साऱ्या गोष्टी कोर्टासमोर आम्ही मांडत आहोत, असंही राजू म्हणाले. तसेच केजरीवाल यांनी अद्याप आपल्या आयफोनचा पासवर्ड ईडीबरोबर शेअर केलेला नाही. त्यामुळे तपासात अडथला निर्माण होत आहे, अशी माहितीही राजू यांनी कोर्टाला दिली. 


केजरीवाल यांना हवीत ही 3 पुस्तकं


दुसरीकडे केजरीवाल यांनी कोर्टाकडे वकिलांच्या माध्यमातून काही औषधं उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच केजरीवाल यांनी तुरुंगामध्ये 3 पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी केली आहे. यामध्ये रामायण, महाभारत आणि पत्रकार नीरजा चौधरी यांनी लिहिलेल्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड' पुस्तकाचा समावेश आहे. तसेच प्रकृतीसंदर्भातील समस्या असल्याने कोठडीत असताना विशेष डाएटची परवानगी देण्यात यावी असंही केजरीवाल यांनी वकिलांच्या माध्यमातून म्हटलं आहे.


सुनावणीला जाताना काय म्हणाले?


केजरीवाल यांना आजच्या सुनावणीसाठी कोर्टात घेऊन जात असताना, 'पंतप्रधान जे काही करत आहेत ते देशासाठी चांगलं नाहीये,' असं म्हटलं.



तिहार तुरुंगात ठेवण्याची तयारी


केजरीवाल यांना तिहार येथील तुरुंगात हलवण्यात येण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली आहे. त्यांना कोणत्या कोठडीत ठेवलं जाईल यासंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही. तिहार तुरुंगाच्या आवारातमध्ये अंतर्गत 9 वेगवेगळ्या भागांमध्ये तुरुंग विभागण्यात आला आहे. इथे एकूण 12 हजार कैदी आहेत. काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे नेता संजय सिंह यांना 2 नंबरच्या तुरुंगातून 5 नंबरच्या तुरुंगात हलवण्यात आलं आहे. मनीष सिसोदिया यांना 1 नंबरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. 7 क्रमांकाच्या तुरुंगामध्ये सत्येंद्र जैन यांना ठेवण्यात आलं आहे. ईडी आणि सीबीआयशी संबंधित वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये या नेत्यांना अटक करम्यात आली आहे.