DCW chief Swati Maliwal Molested : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष (Delhi Commission For Women) स्वाती मालीवाल यांना छेडण्यात आल्याची आणि कारने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद चालकाने जवळपास 10 ते 15 मीटपर्यंत स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना फरफटत नेलं. गुरुवारी पहाटे 3 वाजता ही घटना घडली. स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वाती मालीवाल यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "काल रात्री मी दिल्लीमधील महिलांच्या सुरक्षेची पाहणी करत होते. यावेळी एका कारचालकाने मद्यधुंद अवस्थेत माझी छेड काढली. मी त्याला पकडलं असता त्याने गाडीची काच बंद केली आणि मला फरफटत नेलं. देवाने माझा जीव वाचवला. जर दिल्ली महिला आयोगाची अध्यक्षच सुरक्षित नसेल तर परिस्थिती काय असेल याचा विचार करा".



गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एम्स रुग्णालयाच्या गेटवर ही घटना घडली. चालकाने स्वाती मालीवाल यांना कारमध्ये बसण्यास सांगितलं असता त्यांनी जाब विचारला होता. यावेळी त्याने काच बंद केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्वाती यांचा हात काचेत अडकल्याने जवळपास १० ते १५ मीटपर्यंत त्या फरफटत गेल्या. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश चंद्र असं या चालकाचं नाव आहे. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.