नवी दिल्ली - एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी २०१४ मध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणाचा तपास करण्यात यावा, असे आदेश दिल्लीतील कडकडडुमा न्यायालयाने मंगळवारी दिले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास थांबविण्यात आल्याचे जाहीर केल्यानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे आदेश दिले. सामाजिक कार्यकर्ते अजय गौतम यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण दिल्याचे वार्तांकन एका ऑनलाईन लेखात वाचल्यानंतर अजय गौतम यांनी असदुद्दिन ओवैसी यांच्याविरोधात हैदराबादमध्ये पोलिस तक्रार दाखल केली. असदुद्दिन ओवैसी यांनी एका समुदायाच्या मनात द्वेष पसरविण्याचा केलेला प्रकार हा पहिलाच नसून, याआधीही त्यांनी असे कृत्य केले असल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे अजय गौतम यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांनी या प्रकरणी पुन्हा तक्रार दाखल केली. धर्म आणि विखारी भाषा वापरून दोन किंवा अधिक समुदायांमध्ये द्वेष भावना निर्माण होईल असे कृत्य करणे, त्यासाठी कट रचणे, असे आरोप त्यांनी असदुद्दिन ओवैसींवर ठेवले आहेत. आता या प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीत देशातील राष्ट्रीय पक्षांना नाकारण्यासाठी दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजाने एकत्र आले पाहिजे, अशी मागणी ओवैसी यांनी सोमवारी एका जाहीर सभेत केली. कल्याणमधील वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये त्यांनी ही मागणी केली. गेल्या ७० वर्षांत ज्यांच्यावर केवळ सहन करण्याचीच वेळ आली. त्यांनी आता सडेतोड प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशीही अपेक्षा ओवेसी यांनी या सभेमध्ये व्यक्त केली.