#DelhiResults2020: दिल्लीत `आप`ची सरशी, पण भाजपचाही मोठा फायदा
अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दिल्लीत अत्यंत आक्रमक प्रचार केला होता.
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. निकालांचे प्रारंभिक कल पाहता आम आदमी पक्षाला (आप) बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहील. तर काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता येणार नाही, असे चित्र आहे.
वरकरणी हे निकाल 'आप'साठी फलदायी दिसत असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक भाजपसाठी फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात 'आप'ला ५१.७७ तर भाजपला ४१.०२ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 'आप'च्या मतांचे प्रमाण २.८२ टक्क्यांनी घटले आहे. तर या निवडणुकीत भाजप हारणार असे चित्र असले तरी भाजपच्या मतांमध्ये तब्बल ८.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिल्लीतील मुस्लीम बहुल मतदारसंघात कोण आघाडीवर?
भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत अत्यंत आक्रमक प्रचार केला होता. निवडणुकीत भाजपला याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची कामगिरी मात्र निराशाजनकच आहे. २०१५ मध्ये काँग्रेसला ९.७ टक्के मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत हा आकडा ४.०१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही काँग्रेसची पाटी कोरीच राहण्याची शक्यता आहे.
Delhi Election Results 2020: 'या' 5 हाय प्रोफाइल जागांकडे संपूर्ण देशाचं लक्ष
२०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी ६७ जागांवर 'आप'ने बाजी मारली होती. तर भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या होत्या. मात्र, यंदा भाजपला जवळपास २६ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे.