नवी दिल्ली : माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे. दोषींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत माझा लढा संपणार नाही, तो सुरुच राहणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली आहे. निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा पुढील आदेशापर्यंत लांबणीवर गेली आहे. त्यानंतर निर्भयाच्या आईने ही प्रतिक्रिया मीडियासमोर दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद तिहार कारागृहात पोहोचला. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली होती. त्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले होते, असे तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्टही केले होते. मात्र फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तिहार तुरुंग प्रशासनाच्यावतीने इरफान अहमद पटियाला हाऊस कोर्टात हजर झाले.




दरम्यान, निर्भयाची आई आशा देवी आपल्या मागणीवर ठाम आहे. आरोपींच्या वकील मला आव्हान देऊन गेले आहेत. त्यांचे म्हणणं आहे, ही फाशी मी अनंत काळासाठी स्थगित करुन दाखवेन. मात्र केंद्र सरकार, दिल्ली सरकार, न्यायालय या सगळ्यांना एकच सांगणे आहे, जोपर्यंत चार जणांना फाशी होईपर्यंत मी गप्प बसणार नाही. आज जो निर्णय कोर्टाने दिला आहे. त्याने पु्न्हा एकदा आम्हाला या सगळ्या आरोपींपुढे झुकावे लागल्याची भावना आहे. आरोपींचे वकील सरळ सांगून गेले आहेत की या दोषींना फाशी होणार नाही. आणखी किती काळ आम्हाला न्यायासाठी वाट बघावी लागणार आहे, असा प्रश्नही निर्भयाच्या आईने उपस्थित केला.


१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळ करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना  निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.