नवी दिल्ली : दिल्लीत आजपासून दारूच्या किंमती कमी होणार आहेत. याबाबतीत सरकारने आदेश देखील जारी केले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दारूवर आकारण्यात येत असलेला ७० टक्के कोरोना शुल्क दिल्ली सरकारने रद्द केला आहे. सरकारने दारूवरील कोरोना शुल्क कमी करून २० ते २५ टक्के व्हॅट आकारण्यास सुरूवात केली आहे. हे  नवीन दर १० जून म्हणजेच आज पासून लागू करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान लॉकडाऊनमध्ये दिल्ली सरकारने काही नियम शिथिल करत दारू विक्रीची सुरूवात केली होती. पण सरकारने हा निर्णय घेताच दारूच्या दुकानांवर तळीरामांची एकच गर्दी पाहायला मिळाली. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडताना दिसला. त्यामुळे सरकारने  दारूवर ७० टक्के  कोरोना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. आता तो रद्द करण्यात आला आहे. 


दिल्लीतल्या केजरीवाल सरकारे ५ मे पासून सर्व प्रकारच्या दारूवर ७० टक्के ‘कोरोना शुल्क’ लागू केले होते.  ५ मे पासून ते ६ जून पर्यंत दिल्लीत जवळपास ३०४ कोटी रूपयांची दारू विक्री झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान कोरोना शुल्क आकारल्यामुळे दिल्ली सरकारच्या तिजोरीत २१० कोटी  रूपयांची भर पडली आहे.