नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. जवळपास २४ मार्चपासून देशातील सर्व उद्योग ठप्प झाले होते. शॉपिंग मॉल, चित्रपटगृह आणि सर्व बाजार देखील बंद आहेत. शिवाय देशातील सर्व दारूची दुकानं देखील बंद होती. परंतु  सरकारने ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोनमध्ये लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता दिली होती. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत दारूची दुकानं सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली होती. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दारूची दुकानं सुरू झाल्यामुळे दारू खरेदी करण्यासाठी  तळीरामांनी एकच गर्दी केली. त्यामुळे दिल्लीतल्या केजरीवाल सरकारे ५ मे पासून सर्व प्रकारच्या दारूवर ७० टक्के ‘करोना शुल्क’ लागू केले होते. परिणामी राजधानी दिल्लीत दारूच्या दरात चांगलीच वाढ झाली होती. 


परंतु आता केजरीवाल सरकारने हे ‘करोना शुल्क’ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता छापील किरकोळ विक्री किंमतीत तळीरामांना दारू मिळू शकणार आहे.  १० जूनपासून सर्व प्रकारच्या दारूवर लावण्यात आलेला ७० टक्के ‘करोना शुल्क’ आता मद्यप्रेमींना भरावा लागणार नाही. त्यामुळे दारूचे दरही कमी होणार आहेत.