दिल्लीत मास्क बंधनकारक, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास...
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत चिंताजनक आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत २ हजार १३४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी लादण्यात आलेले नियम अधिक कठोर केले आहेत. दिल्लीत कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी कठोर पावले उचलली आहेत. आता जर कोणी राजधानी दिल्लीत नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले तर त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल.
दिल्लीत राहणाऱ्या लोकांना आता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. शिवाय नागरिकांकडून दंड देखील वसूल करण्यात येणार आहे. सर्वात पहिला नियम आहे क्वारंटाइनबाबत, जर का तुम्ही दुसऱ्या राज्यातून दिल्लीत आले आहात. तर तुम्हाला दिल्ली सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.
या महामारीच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करने बंधनकारक असणार आहे, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक स्थळी ६ फूटांचं अतंर असायला हवं. शिवाय बाहेर पडताना मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही या सर्व नियमांचे पालन करत नाहीत तर तुमच्या विरुद्ध कडक कारवाई होवू शकते.
त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे देखील प्रतिबंधित आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा किंवा सिगारेटच्या सेवनावरही सध्या बंदी घातली जात आहे. या सर्व नियमांचे पालन न केल्यास नागरिकांना ५०० रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. एवढेच नाही तर पुन्हा चूक केल्यास १ हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.