नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कम्युनिटी स्प्रेडची चर्चा सुरु झाली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी म्हटले की, 'एम्सच्या संचालकांनी दिल्लीत कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचे मान्य केले आहे, परंतु केवळ केंद्रच त्याची घोषणा करू शकतो.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी म्हटले की, दिल्लीतील रुग्णालयांबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय एलजी सरकारने रद्दबातल केला आहे, अशा परिस्थितीत आता दिल्लीतील लोकांवर उपचार कोठे होतील. दिल्लीत जगभरातून विमानं येथे आली आहेत. त्यामुळे येथे रुग्ण वाढत आहेत.



'दिल्लीत लोकं बाहेरून आले तर राज्यातील जनतेवर कसे उपचार करणार. केंद्र सरकारने त्यांच्या 10 हजार खाटांवर उपचार करावे. बाहेरुन येणारी विमानं थांबवावी अशी आमची मागणी होती. पण केंद्राने ती मान्य केली नाही.'


'आम्ही सतत बेड वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत, एम्सच्या संचालकांनी कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचं स्वीकारलं आहे. पण केंद्र सरकार ते स्वीकारत नाही. दिल्लीत अशी बरेच रुग्ण आहेत. ज्यांचा कोणताही स्रोत नाही. हा कम्युनिटी स्प्रेड आहे की नाही हे केंद्राने मान्य केले तेव्हा जाहीर होईल.'


जर कम्युनिटी स्प्रेड सुरु झाला असं जाहीर करण्यात आलं. तर याचा अर्थ भारत कोरोनाच्या संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात गेला असा होतो.


विशेष म्हणजे सध्या दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या लढा सुरू झाला आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने निर्णय घेतला होता की दिल्लीतील रुग्णालयात फक्त राज्यातील नागरिकांवरच उपचार केले जातील, परंतु उपराज्यपालांनी हा निर्णय बदलला. त्यामुळे दिल्ली सरकार आणि उपराज्यपाल आमने-सामने आले आहेत.


गेल्या एका आठवड्यात दिल्लीत रोज एक हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत दिल्लीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 29,943 वर पोहोचली आहे तर 874 लोकांचा मृत्यू झाला आहे.