दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर नाही सांगत हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडून करण्यात आलेली अटक आणि कोठडीला आव्हान देत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने याचिका फेटाळून लावत ईडीला मिळालेली रिमांड बेकायदेशीर नाही असं मह्टलं आहे. कायद्याच्या दृष्टीकोनातून केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांनी निर्णय सुनावताना हे केंद्र सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील प्रकरण असल्याचं म्हटलं. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. कोणालाही विशेषाधिकार दिले जाऊ शकत नाहीत. ईडीकडे सबळ पुरावे आहेत. चौकशीतून मुख्यमंत्र्यांना सूट दिली जाऊ शकत नाही. न्यायाधीश कायद्याला बांधील आहेत, राजकारणाला नाही असं ते म्हणाले आहेत. 


दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर म्हटलं की, "ईडीने युक्तिवाद करताना याचिकाकर्ता संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याचं सांगिलं आहे. याप्रकरणी राघव मुंगटा, शरत रेड्डी असे अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत". अरविंद केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत सरकारी साक्षीदारांच्या जबाबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावर हायकोर्टाने नाराजी जाहीर करत त्यांचे जबाब ईडी नाही तर कोर्ट लिहितं, तुम्ही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल तर याचा अर्थ आमच्यावर करत आहात असं म्हटलं. 


अरविंद केजरीवाल यांच्याकडे साक्षीदारांना क्रॉस करण्याचा अधिकार आहे. पण कनिष्ठ न्यायलयात करु शकतात, हायकोर्टात नाही. एखाद्या व्यक्तीच्या सुविधेनुसार तपास सुरु राहू शकत नाही. तपासादरम्यान तपास यंत्रणा एखाद्याच्या घरी जाऊ शकते असंही कोर्टाने म्हटलं. 


याआधी मद्य घोटाळ्यात एका आठवड्यात कोर्टाने दोन निर्णय दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना दिलासा देत जामीन दिला. दुसरीकडे बीआरएस नेत्या के कविता यांची जामीन याचिका ट्रायल कोर्टाने फेटाळली. आता अरविंद केजरीवाल यांच्यासंबंधी हायकोर्टाने निर्णय दिला आहे. ईडीने मद्य घोटाळा प्रकरणी 21 मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. मद्य घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणातील ते सूत्रधार असल्याचं ईडीने म्हटलं आहे. गेल्या 20 दिवसांपासून अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत. संजय सिंह यांच्यानंतर आपल्यालाही दिलासा मिळेल अशी त्यांना आशा होती. पण हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने आता ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात.