नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या बुराडीमधील संतनगर भागात एकाच घरात ११ मृतदेह मिळाल्यानं खळबळ माजली. याप्रकरणी आता नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. पण याप्रकरणाचं गूढ मात्र रोज वाढतच चाललं आहे. धार्मिक विश्वासातून या कुटुंबानं आत्महत्या केल्याचं पोलिसांना वाटत आहे. पण मृत्यू झालेल्या परिवाराचे नातेवाईक ही हत्या असल्याचा आरोप करत आहेत. सोमवारी काही मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. यामध्ये फास लागून मृत्यू झाल्याचं कारण समोर आलं आहे. घरात मिळालेल्या नोट्समुळे या प्रकरणाचं रहस्य हळू हळू उलगडू लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी संध्याकाळी ७ मृतदेहांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. या रिपोर्टनुसार वृद्ध महिलेचा मृत्यू आत्महत्या आहे. या वृद्ध महिलेचा मृतदेह जमिनीवर मिळाला होता. तर घरातले इतर जण फासाला लटकलेले आढळले. या सगळ्या मृतदेहांच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात आली होती.


नोट्समध्ये वट पौर्णिमेचा उल्लेख


घरात मिळालेल्या नोट्समध्ये वट पौर्णिमेचा विशेष उल्लेख असल्याचं आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. घरात मिळालेल्या दोन वह्यांमधल्या गोष्टींचं घरातले सदस्य अनुकरण करणार होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.


यातल्या एका वहीमध्ये वडाची पूजा करण्याचं वक्तव्य आहे. २७-२८ जूनला वट पौर्णिमा होती. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं वास्तव्य असतं. वडाच्या झाडाचं आयुष्य दुसऱ्या झाडांच्या तुलनेत जास्त असते. म्हणून वडाची पूजा केल्यामुळे जास्त आयुष्य लाभतं, अशी धारणा आहे.


या कुटुंबाच्या घरातून मिळालेल्या वहीमध्ये वडाच्या पूजेवर विशेष भर देण्यात आला आहे. कुटुंबाचे मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत सापडले. हे मृतदेह वडाच्या पारंब्यांसारखे लटकलेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं. घराच्या भिंतीवर ११ वेगवेगळ्या आकाराचे पाईप लावण्यात आले होते. या पाईपलाच मृतदेह लटकलेले होते.


पोलिसांना सापडलेल्या वहीमध्ये विशेष पुजेआधी सगळ्यांनी बाहेरून खाणं मागवायचं आणि पुजेवेळी फोनपासून लांब राहण्याचं लिहीलं होतं. पोलिसांना घटनास्थळी ६ मोबाईल फोन सायलेंट मोडवर एकाच ठिकाणी मिळाले आहेत.


मुलाला पडायची स्वप्न?


मृत्यू झालेल्या दोन मुलांपैकी एका मुलाच्या स्वप्नात त्याचे वडील यायचे. स्वप्नात येऊन वडील मुलाला छोट्या-मोठ्या निर्णयाबद्दल मत व्यक्त करायचे. मुलंही वडिलांच्या मताचं पालन करायचं, असं या कुटुंबाच्या नातेवाईकांनी सांगितल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.