नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA)सोमवारी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर शाहदराचे पोलीस उपायुक्त अमित शर्मा या हिंसाचारात गंभीर जखमी झाले आहेत. पूर्व दिल्लीतील अनेक भागांमध्ये सोमवारी CAA समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. भजनपुरा, मौजपूर आणि गोकुळपुरीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी गोकुळपुरी येथे झालेल्या तुफान दगडफेकीत हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकारानंतर दिल्ली शहरात जवळपास १० ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर मौजपूरमध्ये काही आंदोलकांकडून हवेत गोळीबारही करण्यात आला. 


यापूर्वी रविवारीही दिल्लीत CAA समर्थक आणि विरोधक आपापसांत भिडले होते. याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत या हिंसाचारात १० पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाला होता. तसेच काही वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली होती. 


दिल्लीच्या जाफराबादमध्ये रविवारी अनेक महिला CAA विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. यानंतर दुपारच्या सुमारास CAA समर्थक आणि विरोधकांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती. सुरक्षेच्यादृष्टीने दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून जाफराबाद आणि मौजपूर-बाबरपूर रेल्वेस्टेनशची प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. या स्थानकांवर मेट्रो थांबणार नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.