Jahangirpuri Violence: जहांगीरपुरीत पुन्हा तणाव, तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक
जहांगीरपुरी भागात पोलिसांवर दगडफेक, पॅरा मिलिटरी फोर्सची तातडीची कारवाई
Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आली. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर लगेचच जहांगीरपुरी भागात दगडफेक करण्यात आली.
तपास पथकावर दगडफेक
मिळालेल्या माहितीनुसार, तपासासाठी आलेल्या पोलिस पथकाने एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. मात्र, परिसरात तैनात पॅरा मिलिटरी फोर्सने तातडीने कारवाई केली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचं पथक करत आहे.
'कोणालाही सोडले जाणार नाही'
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी पत्रकार घेतली. या हिंसाचारात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, मग तो कोणत्याही वर्गाचा, पंथाचा आणि धर्माचा असो. या प्रकरणाच्या तपासासाठी 14 पथके तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
सीसीटीव्ही आणि डिजिटल मीडियाचं फुटेज तपासलं जात असल्याची माहिती दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे. एफएसएलच्या पथकांनी आज घटनास्थळी भेट दिली.