नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  आईनेच आपल्या पोटच्या दोन महिन्यांच्या निष्पाप मुलीची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर या महिलेने चिमुरडीला ओव्हनमध्ये ठेवलं. निष्पाण चिमुरडीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. ही घटना दिल्लीतील मालवीय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील चिराग दिल्ली गावात घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिराग दिल्ली गावात राहणाऱ्या या महिलेने मुलाच्या हव्यासापोटी आपल्या दोन महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आरोपी महिलेने मृतदेह घराच्या छतावर पडलेल्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवला. यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पण पोलिसांना संशय आल्याने त्यांनी घराची झडती घेतली असता घराच्या छतावर ओव्हनमध्ये चिमुरडीचा मृतदेह सापडला. 


मालवीय नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मुलीच्या पालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन कौशिक हे चिराग दिल्ली गावात आपल्या कुटुंबासह राहतात. कुटुंबात पत्नी डिंपल कौशिक, चार वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी होती. गुलशनची आई आणि भाऊही त्याच्यासोबत राहतात आणि घराखाली किराणा दुकान चालवतात.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी दुपारी 3.15 च्या सुमारास चिराग दिल्ली गावातून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. मुलीची आजी घरात मुलीचा शोध घेत होती. घरात झडती घेतली असता मुलीचा मृतदेह घराच्या छतावर मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आढळून आला. मुलीच्या आजीने मुलीचा मृतदेह बाहेर काढला. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आणि मुलीच्या पालकांना ताब्यात घेतलं.