दिल्ली (Delhi Police) पोलिसांनी मोस्ट वाँटेड आरोपी राजविंदर सिंग (rajwinder singh) याला अटक केली आहे. राजविंदर सिंग हा 2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील (Australia) क्वीन्सलँड येथे एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्याप्रकरणात फरार होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजविंदर सिंग याला ताब्यात घेतले आहे. राजविंदर सिंग गेल्या चार वर्षांपासून फरार होता. क्वीन्सलँड पोलिसांनी (Queensland's Police) राजविंदर सिंगच्या अटकेवर 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल साडे पाच कोटींचं बक्षीस ठेवले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियात एका महिलेची हत्या करून राजविंदर सिंग भारतात पळून आला होता आणि वेशांतर करुन दिल्लीत राहत होता. अखेर गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या ऑस्ट्रेलियातील या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. राजविंदर सिंग (38) हा मूळचा पंजाबमधील (Punjab) बट्टर कलानचा असून, 2018 मध्ये 24 वर्षीय ऑस्ट्रेलियातील टोयाह कॉर्डिंगलीची (Toyah Cordingley) हत्या करुन फरार झाला होता. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी त्याच्यावर 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी बक्षीस म्हणून जाहीर केलेली ही सर्वात मोठी रक्कम होती. ऑस्ट्रेलियन सरकारने मार्च 2021 मध्ये भारताला राजविंदर सिंगचे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली होती.


इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस


क्वीन्सलँड पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. सीबीआय, इंटरपोल आणि स्पेशल सेलने केलेल्या संयुक्त कारवाईत गुप्त माहितीच्या मदतीने आरोपी राजविंदर सिंगला पकडण्यात आले. इंटरपोलने या आरोपीबाबत रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. यासोबतच भारतातील सीबीआय आणि इंटरपोलने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.


24 वर्षी टोया कॉर्डिंगलीची हत्या केल्यानंतर दोनच दिवसांनी राजविंदर सिंग भारतात पळून गेल्याचे म्हटले जात आहे. पत्नी आणि तीन मुलांना सोडून ऑस्ट्रेलियातून राजविंदरने पळ काढला होता. राजविंदर अमृतसर विमानतळावर उतरला होता आणि कामामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता, असे त्याच्या भावाने सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्याच्याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही.


कशी झाली हत्या?


क्वीन्सलँडमधील वांगेटी बीचवर कुत्र्याला फिरवत असताना टोया कॉर्डिंगली हिची हत्या करण्यात आली. इनिसफिलमध्ये करणारा राजविंदर सिंग या प्रकरणात मुख्य संशयित होता. कॉर्डिंगलीच्या हत्येनंतर दोन दिवसांनी तो आपली नोकरी, पत्नी आणि तीन मुले सोडून ऑस्ट्रेलियात पळून गेला होता.