कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, पत्नी आणि मुलाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
कोरोना या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.
नवी दिल्ली : कोरोना या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांचा देखील समावेश आहे. शिवाय आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणारे कोरोनावीर देखील या धोकादायक विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. तर काहींचा मृत्यू देखील झाला आहे. ६ मे रोजी दिल्लीतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता त्यांच्या पत्नी आणि ३ वर्षाच्या मुलाचे रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आले आहेत.
दिल्लीत सोनीपत भागात हे कुटुंब सध्या वास्तव्यास आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळताच सोनीपत परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या सोनीपत प्रशासनाच्या देखरेखीखाली आई आणि मुलावर उपचार सुरू आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या देशात आता साठ हजारांचा आकडा गाठण्याच्या मार्गावर आहे. सध्या कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५९ हजार ६६२ वर पोहोचली आहे.
मागील चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या प्रसाराचा वेग पाहता, जवळपास ३३२० नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तर, चोवीस तासांच्या कालावधीत ९५ जणांना जीव गमवावा लागला.