नवी दिल्ली: सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या हिंसाचाराने मंगळवारी अधिक उग्र रुप धारण केले. या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीच्या काही भागांमध्ये पोलिसांकडून शुट अॅट साईटचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या सोशल मीडियावर यमुना विहार येथील नूर ए इलाही चौकातील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांकडून शुट अॅट साईटचे आदेश देण्यात आल्याची घोषणा होताना दिसत आहे. लोकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये. दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश आहेत. त्यामुळे लोकांनी घरात राहावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला आहे. तर १३० जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत एका महिन्यासाठी (२४ फेब्रुवारी ते २४ मार्च) जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काहीवेळापूर्वीच दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एसएन श्रीवास्तव यांची विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 



तसेच हिंसाचारग्रस्त भागातील शाळा, महाविद्यालये उद्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येणार आहेत.



दरम्यान, दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत लष्कराचा पाचरण करण्याची मागणी करण्यात आली. पण गृहमंत्रालयाने याला नकार दिल्याचे समजते.