#PadmaAwards : राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण
विविध क्षेत्रांत महत्तवपूर्ण योगदान देणाऱ्या मंडळींच्या कार्याचा गौरव
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचा जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच नवी दिल्लीत पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कला, क्रीडा, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामिगिरी बजावणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यावेळी पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. ११२ पैकी ५६ जणांना सोमवारी पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. तर, उर्वरित पुरस्कार विजेत्यांना १६ मार्चला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं कळत आहे .
राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मल्याळम अभिनेता विश्वनाथन मोहनलाल अर्थात मोहनलाल, नृत्यदिग्दर्शक- अभिनेता प्रभुदेवा, गायक शंकर महादेवन, तालवाद्य वादक शिवमणी यांना कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्य़ात आलं. कलेसोबत क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कबड्डीपटू अजय ठाकूर, बजरंग पुनिया, शरद कमल, हरिका द्रोणावल्ली यांनाही सन्मानित करण्यात आलं.
डॉ. अभय बंग आणि त्यांची पत्नी राणी बंग यांनाही त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आलं. शिवाय सरदार सुखदेव सिंग धिंडसा आणि हुकुमदेव नारायण यांनाही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी विक्रमी नामांकनांची नोंद करण्यात आली होती. नामांकनासाठी प्रवेश येणाऱ्यांचा आकडा हा २०१४ च्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढला होता.