गौतम गंभीर, मनोज वाजपेयी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
प्रकृती अस्वस्थ्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांची पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारण्यास अनुपस्थिती
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांच वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रांत महत्तवपूर्ण योगदान देणाऱ्या मंडळींच्या कार्याचा गौरव करण्यात आला. प्रसिद्ध उद्योजक, एल अँन्ड टी समूहाचे अध्यक्ष अनिल नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. एमडीएच मसाले उद्योगाचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रकृती अस्वस्थ्यामुळे बाबासाहेब पुरंदरे पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारण्यास राष्ट्रपती भवनात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप त्याची तारीख ठरलेली नाही. याशिवाय अभिनेता मनोज वाजपेयीला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तर क्रिकेटपटू गौतम गंभीर, तिरंदाजीतील खेळाडू बोंबायला देवी, आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कला, क्रीडा, समाजसेवा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामिगिरी बजावणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले. यावेळी पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. ११२ पैकी ५६ जणांना ११ मार्च रोजी पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तर, उर्वरित पुरस्कार विजेत्यांना १६ मार्च रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.