Delhi Rape Case: राजधानी दिल्ली सध्या आणखी एका बलात्कारामुळे हादरली आहे. बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असून, तिला गर्भवती केलं होतं. यावेळी त्याच्या पत्नीने मुलीला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या होत्या. प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे. या प्रकरणानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल आंदोलन करत आहेत. ज्या रुग्णालयात पीडित मुलीला दाखल करण्यात आलं आहे, त्या रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवरच त्या झोपल्या. पोलीस गुंडगिरी करत असून आपल्याला पीडित मुलगी आणि तिच्या आईला भेटू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला पीडित मुलगी आणि तिच्या आईला भेटू का दिलं जात नाही अशी विचारणा स्वाती मलिवाल यांनी केली आहे. "दिल्ली पोलीस गुंडगिरी करत आहेत. ते मला ना मुलीला भेटू देत आहेत, ना तिच्या आईला. दिल्ली पोलिसांना माझ्यापासून नेमकं काय लपवायचं आहे, ते समजत नाही. बालसंरक्षण राष्ट्रीय आयोगाच्या (NCPCR) अध्यक्षांना मुलीच्या आईला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती अशी माहिती मला मिळाली आहे," असं त्या म्हणाल्या. 


"जर बालसंरक्षण आयोगाचे अध्यक्ष मुलीच्या आईला भेटू शकतात, तर मला परवानगी का नाही?," अशी विचारणा स्वाती मलिवाल यांनी केली आहे. स्वाती मलिवाल सोमवारी संध्याकाळपासून रुग्णालयात ठाण मांडून आहेत. जोपर्यंत आपल्याला पीडित मुलीला भेटू देत नाही तोवर आपण परत जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. 



"मुलीला सर्व मदत मिळत आहे की नाही हे मला जाणून घ्यायचं आहे. तसंच तिला योग्य उपचार मिळत आहेत की नाहीत हेदेखील समजलं पाहिजे," असं स्वाती मलिवाल म्हणाल्या आहेत. 


प्रकरण काय आहे?


दिल्लीमध्ये महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीला  बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने आपल्याच मित्राच्या 14 वर्षीय मुलीवर (सध्याचं वय 17) अनेक महिने बलात्कार करत तिला गर्भवती केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या या कृत्यात त्याच्या पत्नीने त्याला साथ दिली. पत्नीने मुलीला गर्भवती निरोधक गोळ्या दिल्या. 


पीडित मुलगी 12 वीत शिकत असून 1 ऑक्टोबर 2020 रोजी वडिलांचं निधन झाल्यानंतर आरोपी प्रेमोदय खाखा आणि त्याच्या कुटुंबासह राहत होती. प्रेमोदय खाखा हा महिला आणि बाल विकास विभागात उपसंचालक आहे. तो तिचा स्थानिक गार्डियन होता. पीडित मुलगी त्याला मामा म्हणून हाक मारत होती. 



मुलगी 14 वर्षांची असताना आरोपीने नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपी प्रेमोदय आणि त्याच्या पत्नीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पत्नीवर मुलीची गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या दिल्याचा आरोप आहे. 


दरम्यान दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना अटकेच्या सर्व माहितीसह एफआयआरची प्रत देण्याची मागणी केली आहे. तसंच आरोपी अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करण्यात आली आहे याचीही माहिती मागितली आहे. यासह याआधी अधिकाऱ्याविरोधात आलेल्या तक्रारी आणि त्यावर करण्यात आलेली कारवाई याची माहिती देण्यास सांगितलं आहे. दिल्ली पोलीस आणि राज्य सरकारला याप्रकरणी बुधवापर्यंत अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला आहे. 


मुख्य सचिव नरेश कुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार आरोपी खाखा याला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य सचिवांना या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार, निलंबन कालावधीत अधिकाऱ्याला पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय विभाग मुख्यालय सोडण्याची परवानगी नाही.