राजधानी दिल्ली सध्या बलात्कार प्रकरणाने हादरली आहे. दिल्ली सरकारमधील निलंबित अधिकारी प्रेमोदय खाखा याने आपल्या मित्राच्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला. आरोपी बलात्कार करण्याआधी दर वेळी मुलीला बेशुद्ध करत आहे. यामधील एका वेळी मुलीच्या शरिरावर खूप जखमा झाल्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये मुलीच्या वडिलांचं निधन झालं होतं. करोना काळात तिचे वडील गेले होते. पण त्यांचा मृत्यू करोनाने झाला नव्हता अशी सूत्रांची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2020 रोजी पहिल्यांदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. वडिलांच्या निधनाचा मुलीला फार मोठा धक्का बसला होता. यानंतर तिच्या आईने तिला आरोपी अधिकाऱ्याच्या घरी वास्तव्यास पाठवलं होतं. यानंतर काही दिवसातच आरोपीने हे कृत्य केलं होतं. आरोपी हा तिच्या वडिलांचा मित्र होता आणि त्याने तिचं पालकत्व स्विकारलं होतं. मुलीच्या आईने सांगितल्यानुसार, अधिकाऱ्याने आपण तिची काळजी घेऊ असं आश्वासन दिलं होतं. 


पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पाच महिन्यांच्या वास्तव्यात आरोपीने पुन्हा एकदा तिच्यावर बलात्कार केला होता. एका महिन्याने मुलगी आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी झारखंडला गेली होती. त्यानंतर ती पुन्हा आरोपीच्या घऱी परतलीच नाही. 


मुलीने पोलीस जबाबात दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेमोदय घरासह चर्चमध्येही तिचा विनयभंग करत असे. 


वडिलांच्या मृत्यूनंतर पॅनिक अटॅक


पोलिसांनी सांगितलं आहे की, पीडित मुलीला वडिलांच्या निधनानंतर पॅनिक अटॅक येत होते. यामुळे तिला शाळा सोडावी लागली आणि खुल्या शिक्षण संस्थेत दाखल झाली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आधीच वडिलांच्या मृत्यूचा धक्का आणि त्यात बलात्कार यामुळे मुलीला दुहेरी ट्रॉमा सहन करावा लागत होता. यामुळेच तिने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसावी. 


या महिन्यातच तरुणीवर झालेल्या बलात्काराला वाचा फुटली आहे. मुलीला पॅनिक अटॅकमुळे दिल्लीत एका रुग्णालयातील समुपदेशनासाठी नेण्यात आलं असता, डॉक्टरांशी बोलताना तिने हा खुलासा केला. तिच्या आईने तिला रुग्णालयात नेलं होतं. 


आरोपींकडून तपासात सहकार्य नाही?


आरोपी प्रेमोदय खाखा हा दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागात अधिकारी असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा त्यांचा दावा आहे. 


पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीच्या पत्नीने तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या होत्या. मुलीने तिच्याकडे मदत मागितली होती.