Viral News: पोलिसांवर शहराच्या तसंच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. पण अनेकदा खाकी वर्दीच नागरिकांचा शत्रू होते. पोलीस दलातील काही मोजक्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण विभागाची बदनामी होते. त्यातही वाहतूक पोलीस म्हटलं तर ते पैसे मिळवण्यासाठीच कारवाई करतात असा आरोप केला जातो. यादरम्यान, दिल्लीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये दिल्लीमधील वाहतूक पोलीस कर्मचारी कोरियन व्यक्तीला 5000 रुपयांचा दंड ठोठावताना दिसत आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पोलीस कर्मचारी त्याच्यावर कारवाई करतो. पण दंड वसूल केल्याची कोणतीही पावती कर्मचारी देत नाही. ही घटना उजेडात आल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


व्हिडीओत काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ एक महिन्यापूर्वीचा आहे. व्हिडीओत वाहतूक पोलीस कर्मचारी महेश चांद कोरियन व्यक्तीला वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल दंड भरण्यास सांगतो. यानंतर कारमध्ये बसलेल्या कोरियन व्यक्ती 500 रुपयांची नोट बाहेर काढते. त्यावर पोलीस कर्मचारी त्याला 500 नाही, 5000 रुपये असं सांगतो. 


यानंतर कोरियन व्यक्ती खिशातून 5000 रुपये काढून पोलीस कर्मचाऱ्याकडे सोपवते. महेश चांद यानंतर कोरियन व्यक्तीशी हात मिळवतो आणि आभार मानत 'ओके, थँक्यू' असं म्हणतो. ही सर्व घटना कारच्या डॅशबोर्ड कॅमेरात कैद होत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. 



हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना काहींनी दिल्ली पोलिसांना टॅग करत घटनेची माहिती देत कारवाईची मागणी केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी महेश चांद याला निलंबित केलं असून चौकशी सुरु केली आहे. 


दिल्ली पोलिसांचं ट्विट - 


दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, "सोशल मीडिया पोस्टची दखल घेत व्हिडीओत दिसणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं असून, चौकशी बसवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण आहे".



चौकशीदरम्यान महेश चांद याने मात्र आरोप फेटाळला आहे. मी दंड वसूल केल्याची पावती देणार होते, पण तितक्यात चालक कार घेऊन निघून गेला असा दावा त्याने केला आहे.