Delhi Violence: दिल्लीतील हिंसाचारात १० जणांचा मृत्यू; १३० जखमी
ईशान्य दिल्लीत एका महिन्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: सीएए आणि एनआरसीविरोधात ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराची धग अजूनही कायम आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १३० जण जखमी झाले आहेत. कालपासून याठिकाणी हिंसा आणि दगडफेक सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशीही ईशान्य दिल्लीतील तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत एका महिन्यासाठी ( २४ फेब्रुवारी ते २४ मार्च) जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
ईशान्य दिल्लीतील मौजपूर, बाबरपूर, जाफराबाद, गोकुलपुरी, बृजपुरी या परिसरात पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही आतल्या भागांमध्ये दगडफेक होताना दिसत आहे. आज सकाळी मौजपूरजवळ असणाऱ्या ब्रह्मपुरी येथे मोठ्याप्रमाणावर दगडफेक झाली. या हिंसाचारात आतापर्यंत ५६ पोलीस आणि १३० नागरिक जखमी झाले आहेत. तुर्तास दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांना आतापर्यंत ११ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
काल ईशान्य दिल्लीत उसळलेल्या या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांचे हेडकॉन्स्टेबल रतन लाल हे शहीद झाले असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नायब राज्यपाल अनिल बैजाल आणि पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक उपस्थित होते.
विशेष म्हणजे भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दिल्ली हिंसाचारावर भाष्य केले. आमच्यात धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाली. भारतातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावे, अशी मोदींची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले. दिल्लीतील धार्मिक हिंसाचाराबद्दलही मी ऐकले. मात्र, त्याबाबत आमच्यात बोलणे झाले नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले. दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन बैठका घेतल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अमित शाह यांच्यातही बैठक झाली.