जेवण पोहोचवल्यानंतर डिलिव्हरी बॉय रडू लागला, त्या व्यक्तीनं पाणी दिलं, आणि...
ऑनलाईन फूड डिलीव्हरीने लोकांचं आयुष्य सुखी आणि आनंदी केलं आहे.
मुंबई : ऑनलाईन फूड डिलीव्हरीने लोकांचं आयुष्य सुखी आणि आनंदी केलं आहे. ज्यामुळे लोक कोणत्याही वेळी, कुठेही बसुन आपल्याला आवडत असलेल्या पदार्थाचा आनंद घेऊ शकतात. हे जेवण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात ते फूड डिलीव्हरी बॉय. परंतु बऱ्याचदा जेव्हा हे डिलीव्हरीबॉय आपलं जेवण उशीरा घेऊन येतात. तेव्हा काहीजण या लोकांवरती ओरडतात. जे फारच चुकीचं आहे. स्टँड-अप कॉमेडियन साहिल शाहने ट्विटरवर यासंबंधीत एक अतिशय भावूक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामधून त्याने फूड डिलिव्हरी बॉयची व्यथा सांगितली आहे.
साहिल शाहने ट्विटरव लिहिले की, "आज माझ्यासमोर बोलत असताना एक फूड डिलिव्हरी बॉय रडू लागला, कारण माझं जेवण पोहोचवताना त्याचा तीनदा अपघात होता होता वाचला. मी त्याला पाणी दिलं आणि टीप दिली. तसेच त्याची माफी मागितली कारण माझे 500 रुपयांचे जेवण त्याच्या जीवापेक्षा जास्त नाही, कृपया डिलिव्हरी करणाऱ्या लोकांशी चांगले वागा. ते त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत."
आपल्या ट्विटमध्ये साहिल शाहने लिहिले की, 'जेवणाला उशीर झाला तरी काही फरक पडत नाही, मी राग समजू शकतो. मात्र जीव धोक्यात घालून ते तुमच्यासाठी अन्न आणत आहेत. तुम्हाला किती भूक लागली आहे हे महत्त्वाचे नाही. पण ते एखाद्याच्या जीवावर बेतू नये.'
साहिलनेही आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'जे लोक जेवण देण्यासाठी येत आहेत, त्यांना टीप द्या. त्यांना ना सन्मान मिळतो ना चांगला पैसा. त्यांच्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी बोला, त्यांचा आदर करा. साहिलच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट केले आहे.
साहिल शाहचं हे ट्वीट सर्वांनाच भावूक करणारं आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. एवढेच काय तर लोकं असं देखील म्हणत आहे की, 10 मिनिटांत डिलिव्हरी करणं थांबवावे. कारण वेळेवर पोहोचण्याच्या नादात बऱ्याचदा हे लोक अपघाताला बळी पडतात.