`Rebuild Babri Masjid...`;JNU च्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसच्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा लिहिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जेएनयूमध्ये लोकांना भडकवण्याच्या प्रयत्नात, कॅम्पसच्या भिंतींवर बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहे
JNU : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पुन्हा एकदा द्वेषपूर्ण वक्तव्याचं प्रकरण समोर आले आहे. स्कूल ऑफ लँग्वेज 2 च्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या भिंतीवर बाबरी मशीदीसंदर्भात एक विधान लिहीलं आहे. त्यासोबत तारीख लिखून त्याखाली NSUI असे लिहिलेले आहे. यामध्ये बाबरी मशीद पुन्हा बांधण्यात येण्याबाबत सांगण्यात आले आहे. हे स्लोगन नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या नावावर लिहिलेले आहे. मात्र एनएसयूआयने याच्याशी कोणताही संबंध असल्याचा दावा फेटाळला आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात बाबरी मशिदीबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या भाषा अभ्यास केंद्राच्या भिंतीवर एक वादग्रस्त घोषणा लिहिली आहे. बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीबाबत घोषणा या भिंतीवर लिहीण्यात आली आहे. देशाच या मुद्द्यावरून बराच वाद यापूर्वी झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा अशाप्रकारची घोषणा देशातील महत्त्वाच्या विद्यापीठात लिहीण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.
जेएनयूमधील भाषा अभ्यास केंद्राच्या भिंतीवर 'Rebuild Babri Masjid, 6 December' असे लिहिले आहे. तसेच घोषवाक्याच्या पुढे NSUI देखील लिहिलेले आहे. एनएसयूआयने अशा प्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे एनएसयूआयचे अध्यक्ष सुधांशू शेखर यांनी, त्यांच्या संघटनेचा अशा वादाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटलं आहे.
एनएसयूआयच्या जेएनयू युनिटचे अध्यक्ष सुधांशू शेखर यांनी याबाबत भाष्य केले आहे. "संघटनेचे नाव आधीच काळ्या मार्करने लिहिले गेले होते. लाल मार्करने नंतर घोषणा लिहिल्या आहेत. आमच्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा घोषणांवर आम्ही जेएनयू प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी करत आहोत. पण, जेएनयू प्रशासन अशा प्रकरणांचा तपास करत नाही. भाषा अभ्यास केंद्राच्या खाली सीसीटीव्ही बसवलेले असताना, त्यांचे फुटेज स्कॅन करून आरोपींपर्यंत पोहोचता येईल," असे सुधांशू शेखर यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, जेएनयू कॅम्पसमध्ये भिंतींवर घोषणा लिहिण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. एबीव्हीपी आणि एनएसयूआयशी संबंधित विद्यार्थी नेते या प्रकरणावरून एकमेकांसमोर आले आहेत. पण अद्यापपर्यंत जेएनयू प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.