नवी दिल्ली: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या संस्थांमुळेच आज ७० वर्षांनंतरही भारतात लोकशाही जिवंत असल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज ५५ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने आज राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी शांतिवन या नेहरुंच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर राहुल गांधी एक ट्विट केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, भारतासोबत लोकशाही व्यवस्थेची वाट चालायला सुरुवात केलेल्या अनेक राष्ट्रांमध्ये आता हुकूशाही आली आहे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निर्माण केलेल्या खंबीर, स्वायत्त आणि आधुनिक संस्थांमुळे आज ७० वर्षांनंतरही भारतातील लोकशाही जिवंत आहे, असे राहुल यांनी म्हटले. 



मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हुकूमशाही आणू पाहत असल्याची टीका काँग्रेसकडून नेहमीच करण्यात येते. लोकसभा निवडणुकीतही विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास संविधानाला धोका उत्त्पन्न होईल, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला होता. भाजपच्या काळात अनेक स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य हिरावले गेल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळातही विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदी सरकार त्यांच्यावर दबाव आणत असल्याची टीका केली होती.