दिल्लीची जामा मशीद तोडा, देवतांच्या मूर्ती मिळतील- साक्षी महाराज
भारतातील जवळपास ३००० मंदिरे पाडून त्याठिकाणी मशिदी उभारण्यात आल्या
नवी दिल्ली: दिल्लीतील जामा मशिद जमीनदोस्त करावी, असे वादग्रस्त वक्तव्य करुन केंद्रीय मंत्री साक्षी महाराज यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारने जामा मशीद पाडावी. जर मशिदीच्या पायऱ्यांखाली देव-देवतांच्या मूर्ती मिळाल्या नाहीत तर मला फासावर लटकवा, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले. मी राजकारणात आलो तेव्हा पहिल्याच दिवशी सांगितले होते की, अयोध्या, मथुरा आणि काशीतील चोरांनी जामा मशीद खणावी. जर मशिदीच्या पायऱ्यांखाली देव-देवतांच्या मूर्ती मिळाल्या नाहीत तर मला फासावर लटकवा, हे मी तेव्हापासून सांगत आहे. मी आजही या विधानावर ठाम आहे, असे साक्षी महाराजांनी सांगितले.
मोगल प्रशासकांच्या काळात भारतातील जवळपास ३००० मंदिरे पाडून त्याठिकाणी मशिदी उभारण्यात आल्या, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीविषयी भाजप ठाम आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान साक्षी महाराजांनी दिले.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे देशातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवस अयोध्येत असतील. या पार्श्वभूमीवर अयोध्येत तणावपूर्ण स्थिती आहे. एखादी अनुचित घटना होण्याची भीती लोकांना सतावते आहे. त्यामुळे अनेकांनी जीवनावश्यक वस्तू घरी आणून ठेवल्या आहेत. काही दिवस घरीच राहावं लागल्यास कोणतीही अडचण येऊ नये, याची तयारी स्थानिकांनी केली आहे.
याशिवाय, विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. अयोध्येत अचानक झालेल्या गर्दीमुळे वातावरण तणावपूर्ण झालं आहे. शहरातील स्थिती बिघडण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.