नोटबंदी म्हणजे चूक नव्हे तर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण- राहुल गांधी
नोटबंदी म्हणजे उद्योगपती व भ्रष्टाचाऱ्यांना त्यांच्या काळा पैसा पांढरा करुन घेण्यासाठी केलेली सोय होती.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय ही चूक नव्हती. जनतेचा पैसा मोजक्या भांडवलदारांच्या खिशात घालण्यासाठी मोदींनी जाणीवपूर्वक ही योजना आखली होती, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते गुरुवारी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी नोटबंदी आणि राफेल विमान खरेदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी म्हटले की, नोटबंदी ही चूक नव्हती, तर ते आक्रमण होते. पंतप्रधान मोदींनी जाणूनबुजून हा निर्णय घेतला. भांडवलदारांचा विशिष्ट कंपू मोदींची जाहिरातबाजी (मार्केटिंग) करतो आणि त्या मोबदल्यात मोदी जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालतात, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
नोटबंदी म्हणजे उद्योगपती व भ्रष्टाचाऱ्यांना त्यांच्या काळा पैसा पांढरा करुन घेण्यासाठी केलेली सोय होती. तसेच या माध्यमातून मोदी सरकारला मध्यम व लघूद्योग संपवायचे होते. जेणेकरून अॅमेझॉनसारख्या बड्या ई-कॉमर्स कंपन्यांना भारतीय बाजारपेठ काबीज करता येईल, असे राहुल गांधींनी म्हटले.
अनिल अंबानी यांच्या कंपनीला देण्यात आलेल्या राफेल विमानांच्या निर्मितीच्या कंत्राटातही असाच घोळ आहे. काँग्रेसने केलेल्या आरोपांनंतर अनिल अंबानींकडून आमच्या पक्षाविरोधात अनेक ठिकाणी अब्रूनुकसानीचे दावे दाखल करण्यात आले. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांच्यात काय व्यवहार झाला आहे, हे देशातील जनतेला समजले पाहिजे, असे राहुल गांधींनी सांगितले.