नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१० बॅचच्या एका आयएएस अधिकाऱ्याला 'रेप कल्चर'वर ट्विट करणं महागात पडलंय. आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्याविरुद्ध त्यांच्या विभागानं कारवाई सुरु केलीय. 'पितृसत्ता + जनसंख्या + निरक्षरता + दारू + पॉर्न + टेक्नॉलॉजी + अराजकता = रेपिस्तान' असं ट्विट शाह फैजल यांनी २२ एप्रिल रोजी केलं होतं. या ट्विटनं त्यांच्या अडचणींत भर घातलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फैजल हे जम्मू-काश्मीर राज्याच्या वीज विकास निगम कॉर्पोरपेशनचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते सिव्हिल सर्व्हिस परिक्षेत टॉपर ठरणारे पहिले आणि एकमेव कश्मीरी आहेत. सध्या ते जम्मू - काश्मीर सरकारच्या सेवेतून सुट्टीवर आहेत... आणि फुलब्राईट स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेत गेलेले आहेत. 


बॉसकडून ई-मेलद्वारे एक पत्र मिळाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर 'दक्षिण आशियात रेप कल्चर विरुद्ध माझ्या मिश्किल ट्विटवर माझ्या बॉसनं धाडलेलं हे लव्ह लेटर... लोकशाहीवादी भारतात भावनांशी निगडीत एक असा सेवा नियम आहे जो विचारांच्या स्वतंत्रतेलाच पायदळी तुडवतो, हीच इथली विडंबना' असं म्हणत हे फोटो पोस्ट केलेत.



त्यांनी पोस्ट केलेल्या पत्रात आलेल्या उल्लेखानुसार, 'तुम्ही केलेल्या पोस्ट प्रथमदर्शनी अखिल भारतीय सेवा नियमांच्या प्रावधानांचं उल्लंघन आहे'. 


'हा नोकरशाहीचा अति-उत्साह आहे. यावर कुठल्या कारवाईची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. बलात्कार सरकारी नीतीचा भाग नाही, त्यामुळेच बलात्कारावर टीका करणं म्हणजे सरकारच्या नीतीवर टीका करणं, असं नाही', असं एका वर्तमानपत्राशी बोलताना शाह फैजल यांनी म्हटलंय.