उपमुख्यमंत्री सायकलवरुन ऑफिसला पोहोचतात तेव्हा...
आजपासून ऑड-इव्हन फॉर्म्यूला लागू करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील प्रदूषणाचं वाढतं प्रमाण पाहता आता प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अरविंद केजरीवाल सरकारने ऑड-इव्हन (Odd-Even) फॉर्म्यूला लागू केला आहे. ऑड-इव्हन केवळ सामान्य जनतेसाठी नाही, तर दिल्ली सरकारमधील सर्व मंत्र्यांसाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे. ऑड-इव्हनसाठी दिल्लीतील मंत्रीदेखील योगदान देत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) सायकलवरुन ऑफिसमध्ये पोहचले.
दिल्लीत ऑड-इव्हन नियमांबाबत बोलताना, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं की, प्रदूषणाचा स्तर सतत वाढतं आहे. पण पुढील १० दिवसांसाठी ऑड-इव्हन नियमाचं पालन केल्यास, प्रदूषणापासून काही अंशी दिलासा मिळू शकतो. ऑड-इव्हन प्रत्येकाच्या फायद्याचं असल्याचं ते म्हणाले.
दिल्लीत आजपासून ऑड-इव्हन फॉर्म्यूला सुरु करण्यात आला. दुचाकी वाहनांना ऑड-इव्हनमधून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तसंच महिलांनाही या निमयांत सूट देण्यात आली आहे. महिलेसोबत १२ वर्षांपर्यंत लहान मुलं असल्यास त्या गाडीला सूट देण्यात आली आहे. शिवाय, राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जज, दुसऱ्या राज्यांतील मुख्यमंत्री आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे.
दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या गाड्यांसाठीही ऑड-इव्हन नियम लागू करण्यात आला आहे. बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे दिल्लीत जाण्याआधी आपल्या कारची नंबरप्लेट चेक करणं गरजेचं आहे.
केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारने ऑड-इव्हन नियमांमुळे, ऑफिसच्या वेळांमध्ये काही बदल केले आहेत. काही विभाग सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ पर्यंत असणार आहेत. तर काही विभाग सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहणार आहेत.