नवी दिल्ली: राज्यसभेत बुधवारी बाल लैंगिक अपराध प्रतिबंध अधिनियम सुधारणा (पॉस्को) विधेयक, २०१९ मंजूर करण्यात आले. यावेळी सभागृहात या विधेयकावर चर्चा झाली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी बालपणी माझेही लैंगिक शोषण झाले होते, असा गौप्यस्फोट केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी १३ वर्षांचा असताना बसमधील गर्दीत माझ्यावर हा प्रसंग ओढावला होता. मी टेनिसचा सराव करून घरी चाललो होतो. त्यावेळी मी टी-शर्ट आणि हाफ पँट घातली होती. त्यावेळी एका व्यक्तीने माझ्या हाफ पँटवर वीर्यस्खलन केले. 


मी या घटनेविषयी कोणालाही सांगितले नाही. अखेर अनेक वर्षांनंतर मी माझ्या पालकांना हा प्रसंग सांगितला. मात्र, लोकांनी अशा घटनांविषयी आवाज उठवायला पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण या व्यासपीठाचा वापर केला पाहिजे. याविषयी जितकी चर्चा होईल, बोलले जाईल, तितक्या मोठ्याप्रमाणात लहान मुलांचा लैंगिक शोषणापासून बचाव होईल. या निर्घृण कृत्याला पायबंद घालण्यासाठी आपण काम केले पाहिजे, असे डेरेक ओब्रायन यांनी म्हटले. याठिकाणी प्रश्न शिक्षेचा नाही, तर प्रतिबंधाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. 



यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी डेरेक ओब्रायन यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, एका खासदाराने १३व्या वर्षी घडलेल्या प्रसंगाविषयी आज ४६ वर्षांनी वाच्यता केली. त्यामुळे आता पुरुषांनीही अशा प्रसंगांविषयी बोलायला संकोच करता कामा नये, असे मत स्मृती इराणी यांनी व्यक्त केले.