आता विमानात `या` कंपनीचे लॅपटॉप घेऊन जाण्यास बंदी
विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...
नवी दिल्ली : विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशनने (DGCA) अॅपल मॅकबुकचे (Apple MacBook) काही लॅपटॉप विमान प्रवासात घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. या बंदीबाबत बोलताना DGCAने सांगितलं की, अॅपलच्या या काही लॅपटॉपमध्ये ओव्हर हीटिंगची समस्या आहे. त्यामुळे आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
DGCAने सांगितलं की, अॅपल कंपनीने लॅपटॉपचे काही मॉडेल (१५ इंची मॅकबुक) रिकॉल केले आहेत. या लॅपटॉपची सप्टेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१७ या दरम्यान विक्री करण्यात आली होती. या लॅपटॉपमध्ये बॅटरी ओव्हरहिट होण्याचा धोका असल्याने कंपनीकडून हे लॅपटॉप रिकॉल करण्यात आले आहेत.
अॅपलच्या या काही लॅपटॉपमुळे मोठा धोका संभवण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांना त्यांच्याकडे असणाऱ्या सामानात असे लॅपटॉप घेऊन न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
DGCAकडून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही विमानसेवांसाठी या सूचना देण्यात आल्या आहेत.
अॅपल कंपनीकडून, २० जून २०१९ रोजी आपल्या ग्राहकांकडून MacBook Pro रिकॉल करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती.
भारताआधी, यूरोपियन यूनियन एव्हिएशन सेफ्टी एजेन्सी आणि अमेरिकन फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशनने सर्व विमान कंपन्यांना यासंबंधी सूचना देण्यात आल्या होत्या.