पंतप्रधान मोदी आणि संघातला दुरावा वाढतोय
राम मंदिरावरुन संघ, साधू संत आणि भाजपचे मित्र पक्ष यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना मोदी सरकारकडून मात्र या मुद्द्यावर थंड प्रतिसाद मिळतोय
रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली : नव्या वर्षाचं स्वागत करतानाच पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिरासंदर्भात स्पष्टपणे भूमिका मांडलीय. पण त्यामुळे संघ आणि मोदी यांच्यामधला दुरावा आणखी वाढणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'राम मंदिर लवकरात लवकर उभारावं... त्यासाठी अध्यादेश आणावा लागला तरी चालेल' असं वक्तव्य करून एका नव्या चर्चेला सुरुवात केली. यापूर्वीही आपल्या हयातीत राम मंदिर उभं राहावं, अशी भावनिक साद सरसंघचालकांनी घातली होती. सध्या राम मंदिरावरुन संघ, साधू संत आणि भाजपचे मित्र पक्ष यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना मोदी सरकारकडून मात्र या मुद्द्यावर थंड प्रतिसाद मिळतोय.
कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर राम मंदिराचा विचार करणार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलं. पंतप्रधान मोदींच्या या थेट भूमिकेमुळे संघ आणि मोदींमधलं अंतर वाढलंय. मोदींच्या या विधानानंतर संघानं सरकारच्या जबाबदारीची आठवण करून दिलीय.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय येत नाही, तोपर्यंत राम मंदिराच्या उभारणीसाठी हिंदू समाज वाट बघू शकत नाही. त्यामुळे सरकारनेच या प्रकरणी संसदेत कायदा करावा आणि अयोध्येत राम मंदिराची उभारणी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने बुधवारी नवी दिल्लीमध्ये केली. यावेळी 'आणखी वाट पाहायला लावू नका' असं म्हणत त्यांनी सूचक इशाराही दिलाय.
खरं म्हणजे, याआधाही संघ आणि मोदी यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद झाल्याचं समोर आलंय.
- संरक्षण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआय लागू करायला संघाचा विरोध होता. परंतु मोदींनी संघाचा विरोध न जुमानता एफडीआय लागू केला
- राष्ट्रपती निवड करताना संघाला विचारात घेतले नाही. लालकृष्ण अडवाणींऐवजी रामनाथ कोविंद यांची निवड करण्यात आली
- प्रवीण तोगडीया यांना संघ पाठिशी घालत असल्याच्या मुद्द्यावरून मोदी आणि संघात दुरावा निर्माण झाला
- तसंच स्मृती इराणी यांच्या मनुष्यबळ विकास मंत्रीपदाच्या नियुक्तीवरुनही संघ नाराज होता
राम मंदिराच्या मुद्द्यावरून आता मित्रपक्षांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलंय. 'राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, याचा कायदेशीर अर्थ इतकाच आहे की प्रभू श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत', असे ट्विट करत संजय राऊत यांनी भाजपला टोमणा मारला आहे.
साडे चार वर्षाच्या काळात संघ आणि मोदी यांच्यातले संबंध अधिक ताणले गेले आहेत. त्यात राम मंदिरवरून मोदींच्या वक्तव्याने भडका उडाला आहे. राम मंदिर हा संघासाठी आस्थेचा मुद्दा आहे. परंतु यावरून विरोधकांबरोबरच संघ आणि मित्रपक्षाला मोदींनी अंगावर घेतले आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून येईल का? हे लवकरच कळेल.