नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे विदेश दौरे हे नेहमीच चर्चेचा विषय. त्यामुळे त्यांच्या विदेश दौऱ्यांवर प्रसार माध्यमांसह सर्वसामान्य जनतेचेही विशेष लक्ष. पण, इतके असूनही विदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधानांसोबत कोण-कोण असते किंवा होते, याबाबत सर्वसामान्य जनता तशी अनभिज्ञच. पण, जनतेला आता याची माहिती मिळू शकणार आहे. कारण, पंतप्रधान कार्यालयास (पीएमओ) ही माहिती द्यावीच लागणार आहे. मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) आर. के. माथूर यांनी पीएमओ कार्यालयाला त्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.


दौऱ्यांच्या माहितीचा पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंध नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्याबाबतची माहिती पीएमओ कार्यालयाला गुप्त ठेवता येणार नसल्याचे म्हटले आहे. दोन प्रकरणांमध्ये निर्णय देताना आर. के. माथूर यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे जाहीर न करण्यास पीएमओ कार्यालयाला सवलत दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आयोगाचे म्हणने असे की, बिगर सरकारी व्यक्तिंची नावे आणि यादी मागणी करणाऱ्यांना दिली पाहिजे. कारण, या माहितीचा आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कोणताही संबंध नाही.


आरटीआ कार्यकर्त्यांची सीआयसीने घेतली दखल


दरम्यान, पंतप्रधानांसोबत विदेश दौऱ्यावर कोण-कोण व्यक्ती जातात (प्रतिनिधी मंडळ) याबात पीएमओ कार्यालयाकडे माहिती अधिकाराखाली (आरटीआय) माहिती मागवण्यात आली होती.  नीरज शर्मा आणि अयूब अली नावाच्या दोघा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या बाबत पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती मागवली होती. मात्र, त्याबात पूरेशी आणि योग्य ती माहिती मिळू शकली नसल्याने त्यांनी मुख्य माहिती आयुक्तांकडे (सीआयसी) तक्रार केली होती. ज्याची सीआयसीने दखल घेतली.


काय आहे प्रकरण?


नीरज शर्मा यांनी पंतप्रधान यांच्यासोबत विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासगी कंपन्यांचे सीईओ आणि गुंतवणूकदार तसेच, त्यासंबंधीत अन्य व्यक्तींबाबत माहिती मागवली होती. तर अयूब अली यांनी पंतप्रधानांच्या घर आणि कार्यालयावर होणाऱ्या मासिक खर्चाबाबत माहिती मागवली होती. नीरज शर्मा यांनी जुलै २०१७मध्ये तर, अयूब अली यांनी मे २०१६मध्ये माहिती अधिकाराखाली पीएमओकडे अर्ज केला होता. 


सुरक्षेचे कारण पुढे करत पीएमओने टाळली माहिती


दरम्यान, एका आदेशामध्ये आर. के. माथूर यांनी पीएमओ कार्यालयाला ३० दिवसांमध्ये माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, नीरज शर्मा आणि अयूब अली यांना पीएमओने कळवले की, आरटीआय कायदा कलम ८(१)(अ) अन्वये सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांचे विदेश दौऱ्यातील व्यक्ती आणि त्यांच्या घरासंबंधी माहिती देता येणारनाही. शर्मा आणि अली यांनी माथूर यांना दिलेल्या माहितीत याबातब सांगण्यात आले आहे.