लखनऊ: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांमध्ये शहरी भागातील मजूर मोठ्याप्रमाणावर आपापल्या गावी जाताना दिसत आहे. शेकडो मैलांची पायपीट करून हे मजूर आपले गाव गाठत आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधील मजुरांची संख्या मोठी आहे. मात्र, इतके कष्ट करून आपल्या राज्यात परतल्यानंतर या मजुरांना अमानुष वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथे परराज्यातून आलेले पुरुष, महिला आणि लहान मुलांना रस्त्यावर बसवून त्यांच्यावर निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येत असलेले रसायन फवारले जात असल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. यामुळे अनेकांच्या डोळ्यांची जळजळ व्हायला लागल्याचेही उघड झाले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हीडिओत पोलीस मोठ्या माणसांना आणि लहान मुलांना आपापले डोळे बंद करून घ्यायला सांगताना ऐकायला येत आहे. यानंतर या सगळ्यांवर रसायन फवारले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाविरोधात टीकेची झोड उठली. यावर स्पष्टीकरण देताना स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले की, आम्ही स्थलांतरितांवर क्लोरिन आणि पाण्याचे मिश्रण असणारे द्रावण फवारले. त्यामध्ये इतर कोणतेही केमिकल नव्हते. त्यांना अमानुष वागणूक देण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता. बरेलीमध्ये मोठ्याप्रमाणावर बाहेरील राज्यांतून लोक परतले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हाच चांगला उपाय आहे, असा विचार आम्ही केला. 

यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही स्थानिक अग्निशमन यंत्रणेला बाहेरून येणाऱ्या बसमध्ये निर्जंतुकीकरण रसायन फवारण्याचे आदेश दिले होते. मात्र, काहीजणांनी अतिउत्साहाच्या भरात नागरिकांवरच रसायन फवारले. त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले. 



दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून प्रशासनावर टीका केली. लोकांशी अमानुष पद्धतीने वागू नका. त्यांच्यावर रसायने फवारू नका. यामुळे ते सुरक्षित राहू शकत नाहीत. उलट त्यांच्या आरोग्याला धोकाच निर्माण होईल, असे प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.